जेरुसलेम : हमास आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला असून इस्रायलने गाझामध्ये आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. दरम्यान, हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गाझामध्ये गेल्या २४ तासांत २१० पॅलेस्टिनी नागरिकांचाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सकाळी गाझाच्या उत्तरेकडील बीट लाहिया, दक्षिणेकडील खान युनिस आणि मध्यभागी माघाझी निर्वासित शिबिरांमध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यात किमान ५० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.
हमासशी संलग्न एजन्सीने वृत्त दिले आहे की, माघाझी येथील एका घरावर बॉम्बस्फोट झाला असून त्यात अनेक लोक ठार झाले आहेत. बीत लाहिया येथील चार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. खान युनूस येथील अल-अमल हॉस्पिटलच्या आसपास झालेल्या बॉम्बस्फोटामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या मते, गाझा पट्टीमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून २१,३२० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, तर ५५,६०३ लोक जखमी झाले आहेत.
सैन्यात भरती होण्यास नकार दिल्याने तुरुंगवास
एका १८ वर्षीय इस्रायली तरुणावर सैन्यात भरती होण्यास नकार दिल्याबद्दल खटला चालवण्यात आला असून त्याला ३० दिवसांच्या लष्करी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्रायली मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने लष्करी भरती केंद्रात जाऊन सैन्यात न जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्याने इस्रायल-हमास युद्धाचा हवाला दिला. संघर्ष सुरु झाल्यापासून सैन्यात न जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल’ शिक्षा भोगणारा तो पहिला व्यक्ती आहे.