अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरातील रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामललावर अभिषेक केला. २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. परंतु, हिंदू पंचांगातील तिथीनुसार यंदाचा वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला. या दिवशी लाखो रामभक्तांनी रामललाचे दर्शन घेतले.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिराच्या उभारणीनंतर मागील वर्षभराच्या कालखंडात देश-विदेशातील ३ कोटींहून अधिक भक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. या मंदिराचे तीन मजले पूर्ण झाले आहेत. सध्या मंदिराच्या शिखराचे काम सुरू असून, ते दोन महिन्यांत पूर्ण होईल. गेल्या वर्षभरात रामललाचरणी किती कोटींचे दान आले, याबाबत काही आकडेवारी समोर आली आहे. रामलल्ला मंदिरात विराजमान होऊन एक वर्ष झाले आहे. अशा परिस्थितीत, या एका वर्षात राम मंदिरात किती दान झाले आहे आणि सर्वात जास्त कोणी दान केले आहे, यासंदर्भात काही आकडेवारी देण्यात आली आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत मिळालेल्या दानांची माहिती दिली होती. राम मंदिराच्या दानपेटीत ५५.१२ कोटी रुपयांचे दान जमा झाले होते. पण, आतापर्यंत राम मंदिराला ५००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची देणगी मिळाल्याचे सांगितले जात आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मते, मंदिराच्या समर्पण निधी बँक खात्यात आतापर्यंत ३,२०० कोटी रुपये जमा झाले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे १८ कोटी रामभक्तांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी दान दिले आहे. दरम्यान, केवळ भारतातून नाही तर जगातील अनेक देशांमधून राम मंदिरासाठी दान, देणगी देण्यात आली आहे. आतापर्यंत राम मंदिराला परदेशातून ११ कोटी रुपयांचे देणगी मिळाली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये राम मंदिराला परदेशातून देणग्या स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनुसार, राम मंदिरासाठी सर्वाधिक देणग्या नेपाळ आणि अमेरिकेतून मिळाल्या आहेत.
सर्वाधिक दान कोणी दिले?
कथाकार मोरारी बापूंनी ११.३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. हे आतापर्यंतची सर्वाधिक दान असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिका, कॅनडा आणि युके येथे राहणा-या मोरारी बापूंच्या विविध अनुयायांनी एकत्रितपणे ८ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे म्हटले जात आहे. हिरे कंपनी श्री रामकृष्ण एक्सपोर्ट्सचे मालक गोविंदभाई ढोलकिया यांनी ११ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. दुसरीकडे दररोज दर्शन घेणासाठी आलेल्या भाविकांकडून कोट्यवधींचे दान हे मंदिराच्या दान पेटीत टाकले जात आहे.