मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते २४ ऑक्टोबरपर्यंत या १० दिवसांत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी, गेल्या २४ तासांत ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
दरम्यान, आज पुण्यात सोन्याची वाहतूक करणा-या टेम्पोचीही पोलिसांनी तपासणी केली होती. तर, दोन दिवसांपूर्वी खेड-शिवापूर येथे एका कारमधून ५ कोटींपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर, आज जळगाव आणि बीडमध्येही रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील १९ अमलबजावणी यत्रणांनी एका दिवसात ५२ कोटी रुपयाची मालमत्ता जप्त करण्याची कामगिरी बजावली आहे. विविध ठिकाणी वापरलेले पोलिस विभाग आणि इतर यंत्रणाची तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.
दिवसभरात झालेल्या कारवाईमध्ये नागपूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी ह्या जिल्ह्यांमधल्या मोठ्या कारवायांचा समावेश आहे. ह्यातून निवडणूक यंत्रणा टक्ष असून मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश गेला आहे. प्रत्येक प्रकरणाचे मागील धागेदोरे तपास काढून गुन्ह्याची साखळी मोडून काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत, सर्व मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सीव्हिजील अॅपवर तक्रार करता येते. ह्या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.
कोणत्या विभागातून किती जप्ती?
१) आयकर विभाग ३०,९३,९२,५७३/-
२) रेव्हयून्यू इन्टेलिजन्स ८,३०,८४,८७८/-
३) राज्य पोलिस विभाग ८,१०,१२,८११/-
४) नार्कोटिस्ट कंन्ट्रोल ब्यूरो- २,५०,००,०००/-
५)राज्य उत्पादन शुल्क विभाग – १,७५,००,३९२/-
६) कस्टम डिपार्टमेट ७२,६५,७४५/