21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeसोलापूर६८ लिंग मंदिर व परिसराची रंगरंगोटी सुरू

६८ लिंग मंदिर व परिसराची रंगरंगोटी सुरू

सोलापूर – ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त ६८ लिंगांच्या मंदिरांना रंगरंगोटी करण्यात येत असून, सातारा जिल्ह्यातून म्हसवड येथील कारागीर सध्या या कामात मग्न आहेत. १४ डिसेंबरपासून रंगाच्या कामास प्रारंभ झाला असून, १० जानेवारीपर्यंत ते पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ पैकी १६ लिंग हे मंदिर परिसरात आहेत तर अन्य मंदिरे व लिंग शहराच्या भोवती सर्व दिशांना आहेत. रंगकामाची सुरुवात सोन्नलगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून करण्यात आली. शिवाय श्री रेवणसिद्धेश्वर मंदिराच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सध्या गुरुभेट येथील मंदिराच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. केवळ रंगरंगोटीची कामे नसून, या ६८ लिंगांभोवतालची डागडुजीही करून घेतली जात आहे. मंदिराच्या आवारातील लिंग हे कमी वेळेत रंगवून झाले. मात्र, शहराभोवतालचे लिंग रंगविण्यासाठी कारागीरांना गाडीवरून रंग न्यावा लागत आहे. या रंगाबरोबरच ठरलेल्या कारागिरांनाही शहराभोवतालच्या ६८ लिंग याठिकाणी आणले जाते. या ६८ लिंगांच्या मंदिराची अगोदर स्वच्छता करून मग रंगरंगोटीला सुरूवात केली जाते. रंग देताना कारागिरांना ठेकेदाराकडून सूचना दिल्या जातात.

एकूण सात ते आठ प्रकारचे रंग असून, रंगावर जवळपास लाखाहून अधिकचा खर्च होतो. या रंगरंगोटीपूर्वी डागडुजी आणि गिलावा अशी कामे सुरु आहेत. या कामात १६ लोक गुंतले असून, सकाळी ७ वाजता रंगविण्याच्या कामाला सुरुवात होते. सायंकाळी ७ वाजता हे काम थांबवले जाते. दरवर्षी रंगरंगोटीसाठी ६ ते ७ प्रकारचे रंग मागविले जातात. नियोजनानुसार वेळेत रंगकाम करून घेतले जाते. शहरातील ६८ लिंगांच्या शिखरावरील नक्षीदार रंगकामासाठी साताऱ्यातील म्हसवड येथून कारागिरांना बोलावण्यात आले आहे. त्यांच्या मदतीला मानेगाव (ता. माढा) येथील काही कारागीर आहेत. यंदा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथील ४ कारागीर रंगकाम करीत आहेत.

गेल्या चार वर्षांपासून ६८ लिंग आणि मंदिरांची रंगरंगोटी करत आहे. टेंडर भरून हे काम करून घेतले जाते. १४ डिसेंबर रोजी या कामाला सुरुवात झाली असून, १० जानेवारी रोजी ते पूर्ण करत आहोत. या कामामुळे कामगारांना उत्साह, आनंद व समाधान मिळते. तसेच एक प्रकारे हातून देवाची सेवाच होते. असे रंगकाम ठेकेदार मनोज पेंटर यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR