कोलकाता : वृत्तसंस्था
कोलकात्याच्या ज्युनिअर डॉक्टरांनी संप मिटवण्यास नकार दिला आहे. त्यांनी मुख्य सचिव मनोज पंत यांना ईमेल पाठवून ममता यांच्याशी पुन्हा भेटीची मागणी केली असून, अद्याप सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत. आरजी कर मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणासंदर्भात पोलिस आयुक्त आणि आरोग्य सचिवांना हटवण्यासह ९ ऑगस्ट रोजी कनिष्ठ डॉक्टरांनी राज्य सरकारकडे ५ मागण्या केल्या होत्या. यासाठी ते ४० दिवसांपासून सातत्याने आंदोलन करत आहेत.
१६ सप्टेंबर रोजी कनिष्ठ डॉक्टर आणि ममता यांच्यात बैठक झाली. यामध्ये ममता यांनी डॉक्टरांच्या ५ पैकी ३ मागण्या मान्य केल्या होत्या. त्यांनी पोलिस आयुक्त विनीत गोयल यांना पदावरून हटवले होते. त्यांच्या जागी मनोज वर्मा यांना नेमले. दरम्यान, डॉक्टरांनी बुधवारीही आंदोलन सुरू ठेवले. आरोग्य सचिव एनएस निगम यांचा राजीनामा आवश्यक आहे. रुग्णालयातील धमकी संस्कृती संपवण्याची मागणीही अद्याप मान्य झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे दुसरी बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.