नवी दिल्ली : संसदेतील सुरक्षा भंग प्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर कारवाई केली आहे. बुधवारी (१३ डिसेंबर) झालेल्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी लोकसभा सचिवालयाने आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आले आहे. या घटनेनंतर गृह मंत्रालयानेही चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटकही केली आहे. पोलीस सध्या या सर्व आरोपींची चौकशी करत आहेत. विविध मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधणे हा या लोकांचा उद्देश असल्याचे प्राथमिक पोलिस तपासात उघड झाले आहे.
रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र अशी लोकसभा सचिवालयाने निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तसेच संसदेतील घुसखोरी प्रकरणाती सागर शर्मा (२६), मनोरंजन डी (३४), अमोल शिंदे (२५) आणि नीलम आझाद (४२) अशी आरोपींची नावे असून पाचव्या व्यक्तीचे नाव विशाल शर्मा आहे. त्याला पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी युएपीए अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्यांची चौकशी करण्यात येत आहे.
बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि मणिपूर हिंसाचार यासारख्या मुद्द्यांमुळे आपण त्रस्त असल्याचे पाच आरोपींनी पोलिसांना सांगितले असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे की, संसदेत बसलेल्या लोकांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करता यावी यासाठी त्यांनी मुद्दाम रंगीत धुराचा वापर केला. सर्व आरोपींची विचारसरणी सारखीच होती त्यामुळे त्यांनी सरकारला संदेश देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना कोणी किंवा कोणत्या संस्थेने सूचना दिल्या होत्या, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत.