28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशमध्ये बोट उलटून ७ ठार

मध्य प्रदेशमध्ये बोट उलटून ७ ठार

श्योपूर : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या बोटीत एकूण ११ जण प्रवास करत होते. त्यातील पाच चिमुकल्यांसह सात जणांचा बुडून यात मृत्यू झाला तर चार जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. शनिवारी अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनासह एसडीआरएफ बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढले.
दुर्घटनेतील सर्व प्रवासी हे स्थानिक रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व जण बोटीने अन्त्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे निघाले होते. अचानक आलेल्या वादळामुळे त्यांची बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण ११ जण होते. ज्यांपैकी सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.

त्याचवेळी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बोट दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले आहे की, ‘‘श्योपूरच्या सीप नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मृत झालेल्यांबद्दल मला खूप दु:ख झाले आहे.
अपघातानंतर जिल्हाधिकारी आणि एसपी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून सरकारच्या वतीने मंत्री प्रद्युम्न सिंह देखील घटनास्थळी पोहोचत आहेत.

‘‘एसडीआरएफच्या टीमने घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य सुरू केले, मात्र दुर्दैवाने ७ जणांना वाचवता आले नाही. या दु:खाच्या प्रसंगी आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत,’’ अशी माहिती देखील त्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सात मृतांमध्ये ४-१५ वर्षे वयोगटातील पाच मुले, एक ३५ वर्षीय पुरुष आणि ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR