18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीय१० वर्षांत ७० कोटी मोबाईल युजर्स वाढले

१० वर्षांत ७० कोटी मोबाईल युजर्स वाढले

डिजिटल इंडिया, देशातील ९५ टक्के खेड्यांमध्ये इंटरनेटची सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत देशातील ९५ टक्के खेड्यांमध्ये ३ जी आणि ४ जी इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत ही माहिती दिली. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात (मार्च २०२४) सध्या एकूण ९५.४४ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. त्यापैकी ३९.८३ कोटी ग्रामीण भागातील आहेत. विशेष म्हणजे १० वर्षांत ७० कोटी मोबाईल युजर्स वाढले आहेत. त्यामुळे डिजिटल इंडियाचे ग्रामीण भागासह संपूर्ण देशात जाळे पसरले आहे.

देशात मोबाईलधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच इंटरनेट सुविधाही खेड्यांपर्यंत पोहोचल्या असून, आता जवळपास घरोघरी इंटरनेटचे जाळे पोहोचले आहे. डिजिटल इंडियासारख्या उपक्रमाचा हा सकारात्मक परिणाम दिसत असून, गावोगाव इंटरनेट सुविधा पोहोचल्याने आता ख-या अर्थाने डिजिटल इंडिया निर्माण झाला आहे. त्यामुळेच ऑनलाईन व्यवहाराला गती मिळू शकली. ही सुविधा थेट दुर्गम भागापर्यंत पोहोचल्याने सरकारी योजनाही सहजगत्या राबविणे सोपे झाले आहे.

देशातील एकूण ६,४४,१३१ पैकी ६,१२,९५२ खेड्यांमध्ये (एप्रिल २०२४) ३ जी, ४ जी मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. म्हणजेच देशातील ९५.१५ टक्के गावांमध्ये इंटरनेट सुविधा आहे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत सरकारने मेट्रो, टियर-२ आणि टियर-३ शहरे आणि ग्रामीण आणि दुर्गम भागांना जोडण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. मागील एका दशकात देशातील एकूण मोबाईल ग्राहकांची संख्या २५.१५ कोटींवरून ९५.४४ कोटी झाली आहे. वार्षिक आधारावर १४.२६ टक्के सीएजीआरची वाढ झाली आहे. गेल्या १० वर्षांत देशाच्या कानाकोप-यात दूरसंचार नेटवर्कचा विस्तार करण्यात आल्याचेही सरकारने सांगितले.

भारत नेटमुळे वाढले नेटवर्क
ग्रामीण भागात इंटरनेट ब्रॉडबँड सुविधा देण्यासाठी सरकारने भारतनेट प्रकल्प सुरू केला. देशातील सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर केबलने जोडणे, हा त्याचा उद्देश होता. या प्रकल्पामुळे देशात ब्रॉडबँड सुविधा अधिक प्रमाणात वाढल्या असून, याचे जाळे थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचले.
२.१३ लाख ग्रामपंचायती

भारतनेटशी जोडल्या
केंद्र सरकारने यासंदर्भात दिलेल्या माहितीत भारतनेट प्रकल्पाअंतर्गत २.२० लाख ग्रामपंचायतींपैकी २.१३ लाख ग्रामपंचायती भारतनेटशी जोडल्या गेल्या आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये सरकारने सीमावर्ती भागात मोबाईल टॉवर बसविण्याच्या नियमांमध्ये बदल केला. त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध होण्यास मदत झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR