कोल्हापूर : राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी ७३ हजार विद्यार्थ्यांना तब्बल ७० कोटी ८ लाख रुपयांच्या छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. योजना सुरू झाल्यापासूनची शिष्यवृत्तीची आणि लाभार्थ्यांचीही सर्वाधिक रक्कम व संख्या आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी एन.एम.एम.एस. म्हणजेच शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेण्यात येते. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या ‘सारथी’कडून ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. एन.एम.एम.एस.ची शिष्यवृत्ती निवडक गुणवंतांनाच मिळते. परंतु, ही परीक्षा उत्तीर्ण होणारे गुणवत्तापूर्णच असतात. त्यांना पाठबळ देण्यासाठी ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये ९ वी ते १२ वीपर्यंत नियमित शिक्षण घेणा-या अनुदानित विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेल्या तसेच केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असणा-या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ९ हजार ६०० रुपये असे चार वर्षांत एकूण ३८ हजार रुपये देण्यात येतात. सन २०२४/२५ या वर्षामध्ये आतापर्यंत या शिष्यवृत्तीसाठी राज्यातून ९वी ते १२वीच्या ७३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यातील अर्ज मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या सर्वांना ७० कोटी ८ लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत. त्यातील ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, अमरावती, वर्धा, नाशिक, चंद्रपूर व नांदेड या दहा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना आतापर्यंत २ कोटी ६४ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरणही करण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यातील वितरण लवकरच करण्यात येणार आहे.
सन – विद्यार्थी संख्या – वितरित शिष्यवृत्ती
सन २०२१/२२ – १०,४१४ – ९ कोटी ९९ लाख ७४ हजार रुपये
सन २०२२/२३ – २२.३०० – २१ कोटी ४० लाख ८० हजार रूपये
सन २०२३/२४ – ४४.१०५ – ४२ कोटी ३४ लाख ८ हजार रूपये
सन २०२४/२५ – ७३,००० – ७० कोटी ८ लाख रूपये
या शिष्यवृत्तीमुळे या गटातील विद्यार्थ्यांचा एनएमएमएस परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षण कार्यालयातील अधिका-यांचे सुयोग्य प्रयत्न, प्रोत्साहन यामुळे परीक्षेतील यशाचा टक्का वाढत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत असल्याचे सारथी, उपकेंद्र कोल्हापूरचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी म्हटले आहे.