19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयविनेशच्या ऑलिम्पिक तयारीसाठी सरकारचे ७०,४५,७७५ रु. खर्च

विनेशच्या ऑलिम्पिक तयारीसाठी सरकारचे ७०,४५,७७५ रु. खर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरलेल्या विनेश फोगाट हिला वजनी गटापेक्षा अधिक वजन भरल्याने स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. या घटनेमुळे भारताचं स्पर्धेतील एक हक्काचं पदक हुकल्यानं देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

५० किलो वजनी गटात खेळणा-या विनेश फोगाटचं काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. याबाबत अनेकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, यावर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरानं विनेशला सरकारनं पूर्ण मदत केल्याचं स्पष्ट झालं आहे. तसंच, ऑलिम्पिकच्या तयारीसाठी विनेशला काय देण्यात आलं होतं, किती पैसे देण्यात आले होते, याबाबत क्रीडामंत्र्यांनी माहिती दिली.

ऑलिम्पिकच्या तयारीसाठी विनेश फोगटसाठी खास वैयक्तिक प्रशिक्षक (पर्सनल ट्रेनर) नेमण्यात आले होते. हंगेरीचे तज्ज्ञ प्रशिक्षक व्होलर अकोस आणि फिजिओ अश्विनी पाटील यांची नियुक्ती विनेशसाठी करण्यात आली होती. स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग एक्­सपर्ट आणि स्पॅरिंग पार्टनर नियुक्त करण्यात आले होते. या सर्वांना सरकारकडून पैसे देण्यात आल्याचं मनसुख मांडविय यांनी सांगितलं. विनेशच्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सरकारने ७०,४५,७७५ रुपये खर्च केल्याचे क्रीडामंत्र्यांनी सांगितलं.

मनसुख मांडविय यांनी सांगितलं की, विनेश फोगटला ग्रँड प्रिक्समध्ये सहभागी होण्यासाठी स्पेननं आर्थिक मदत केली होती. तसंच, ३ जुलै ते १३ जुलै दरम्यान माद्रिदमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी अतिरिक्त मदत देण्यात आली. याशिवाय, फ्रान्समधील बोलोन-सुर-मेर येथे ऑलिम्पिकपूर्व प्रशिक्षणासाठी अतिरिक्त मदत देण्यात आली. आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेची दुसरी सिरीज हंगेरी येथील बुडापेस्टमध्ये ६ जून ते ९ जून या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. हंगेरीतील टाटा ऑलिम्पिक केंद्रात १० जून ते २१ जून दरम्यान विशेष कर्मचा-यांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.

याचबरोबर, स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग एक्­सपर्ट नियुक्त करण्यासाठी मदत करण्यात आली. १३ जुलै ते १६ जुलै दरम्यान हंगेरीमध्ये चौथ्या रँकिंगच्या सिरीजमध्ये विनेशला मदत देण्यात आली होती. तसंच, तिला बल्गेरियातील बेल्मेकेन येथे प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतही देण्यात आली. याशिवाय, विनेशला पुनर्वसनासाठी काही उपकरणं खरेदी करायची होती, त्यासाठी सुद्धा सरकारनं मदत केली. एकूण, लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजनेंतर्गत, विनेशला ५३ लाख ३५ हजार ७४६ रुपये आणि एसीटीसीकडून १७ लाख १० हजार ०२९ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याचं मनसुख मांडविय यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR