सोलापूर : एटीएम सेंटरमध्ये अडकलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर करून दोघा अनोळखी इसमांनी संबंधित खातेदाराच्या अकाउंटमधून तब्बल ७६ हजार रुपयांहून अधिक रक्कम काढून फसवणूक केली. ही घटना महावीर चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये घडली. याप्रकरणी कुमार रामचंद्र देवसानी (वय ४९, रा. दत्तनगर, सोलापूर) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी दत्तनगर दत्त मंदिराशेजारी राहणारे कुमार रामचंद्र देवसानी (वय ४९) व त्यांचा भाऊ महेश देवसानी हे एटीएम कार्ड घेऊन होटगी रस्त्यावरील महावीर चौकात असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेले होते. मशीनमध्ये कार्ड टाकून व्यवहार करीत असताना त्यांचे व त्यांचे भाऊ महेश देवसानी यांचे आयसीआयसीआय एटीएम कार्ड मशीनमध्येच अडकले. यासाठी संबंधित बँकेकडे यासंदर्भात माहिती देण्यास गेले. दरम्यान, दोघा अनोळखींनी याचा फायदा उठवत फिर्यादीच्या बँकेतील खाते क्रमांक ०१९९०५०१००३५ यावरून १८ हजार ८०० व भावाच्या खाते क्रमांक ०१९९०५५००४०९ यामधून ५६ हजार ६०० रुपये असे एकूण ७६ हजार ४०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुमार देवसानी यांनी सदर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार शेख करीत आहेत.