28.9 C
Latur
Sunday, February 25, 2024
Homeराष्ट्रीयभारत-यूएईत ८ करार

भारत-यूएईत ८ करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि यूएई यांच्यात द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करणारे आणि सहकार्याला चालना देणारे आज आठ महत्त्वपूर्ण करार झाले. यात गुंतवणूक, वीज, व्यापार, डिजिटल पेमेंट यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूएईचे अध्यक्ष मोहंमद बीन झायेद नहयान यांच्या प्रमुख उपस्थितीत करारावर शिक्कामोर्तब झाले.

दोन देशांच्या दौ-यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी अबुधाबी येथे आगमन झाले. त्यानंतर ते कतारलाही जाणार आहेत. यावेळी मोदी आणि यूएईचे अध्यक्ष नहयान यांच्यात प्रादेशिक स्थिती आणि जागतिक मुद्यावर चर्चा झाली. यूएई हा पश्­िचम आशियातील सामरिक आणि ऊर्जा क्षेत्रातील भारताचा नजीकचा भागीदार समजला जातो. तसेच आजच्या मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) उभय देशातील व्यापाराला आणि व्यवहारांना बुस्ट मिळणार आहे.

उभय नेत्यांच्या चर्चेनंतर द्विपक्षीय गुंतवणूक संधीकरारांसह आठ करारांचे आदानप्रदान करण्यात आले. भविष्यात हे करार उभय देशांतील संबंध आणखी वाढीस लागण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला. बैठकीत मोदी यांनी ‘एमबीझेड’ या नावाने लोकप्रिय झालेल्या यूएई नेत्याला आपले बंधू असल्याचे सांगितले. जेव्हा आपण अमिरातीचा दौरा करतो, तेव्हा आपल्याला घरी आल्यासारखे वाटते. कुटुंबीयांतील सदस्यांना आपण भेटत आहोत, अशीच भावना मनात निर्माण होते, असे मोदी म्हणाले. दोन्ही नेते गेल्या ७ महिन्यांत पाचवेळेस भेटले आहेत. मोदी यांचा संयुक्त अरब अमिरातीचा सातवा दौरा आहे.

तात्काळ पेमेंट भरणा करणारे भारताचे प्लॅटफॉर्म युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि यूएईचे ‘एएएनआय’, देशार्तंगत डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड तसेच भारताचे रूपे कार्ड यास यूएईच्या ‘जयवान’ला जोडण्यासंदर्भात वेगवेगळ््या करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.‘जयवान’ पेमेंट प्रणालीचे अनावरण केल्याबद्दल मोदी यांनी मोहंमद बीन झायेद यांचे अभिनंदन केले. ही प्रणाली डिजिटल रूपे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर आधारित आहे. यावेळी ‘जयवान’ कार्डद्वारे व्यवहार करत अनौपचारिक उद्घाटन केले. डिजिटल व्यवहार प्रणालीला एकमेकांशी जोडल्याने सीमेपलिकडे ‘फिनटेक’ विकासाला आणि व्यवहार करण्यास चालना मिळणार आहे. उभय देशांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड जोडल्याने आर्थिक क्षेत्रात सहकार्य वाढेल आणि यूएईत ‘रुपे’चा वापर वाढेल, असा आशावाद व्यक्त केला. हा करार जुलै २०२३ च्या व्यवहार आणि मेसेजिंग सिस्टिमला जोडण्याच्या एका कराराचा पुढचा टप्पा मानला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR