मुंबई : पोलिस म्हणजे, समाजात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणारे व्यक्तीमत्त्व. पण समाजाचं रक्षण करणारे पोलिस जर भक्षक बनले तर काय? मुंबईतील एका घटनेने असा प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडले आहे. मुंबई पोलिस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मोटार परिवहन विभागात काम करणा-या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून अनेकदा बलात्कार करण्यात आला. एवढेच नाहीतर महिला पोलिस गरोदर राहिल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करुन त्यांना गर्भपात करण्यास भागही पाडण्यात आले याबाबतचे पत्र माध्यमांमध्ये आले आहे. त्यामुळे नेमके प्रकरण काय आहे, याची चर्चा मुंबई पोलिस दलात सुरु आहे.
मुंबईतील मोटार परिवहन विभागात काम करणा-या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून अत्याचार झाल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. एवढेच नाहीतर या महिला पोलिस कर्मचारी गरोदर राहिल्यानंतर त्यांना जबरदस्तीने गर्भपात करण्यास देखील भाग पाडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप महिला पोलीस कर्मचा-यांनी केल्याचे या पत्रात म्हटले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ देखील या अधिका-यांनी बनवल्याचा आरोप महिला पोलिस अधिका-यांनी केला आहे. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचा-यांनी केला आहे, असा उल्लेख या पत्रात आहे.
महिला पोलीस कर्मचा-यांनी वरिष्ठ पोलिस अधिका-यांची तक्रार करणारे पत्र पोलिस अधिका-यांना पाठवले आहे. आपल्या तक्रार अर्जात महिला पोलीस कर्मचा-यांनी आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगितली आहे. तसेच, पोलीस कर्मचा-यांनी पोलिस आयुक्तांकडे वरिष्ठ पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
पत्र बनावट असल्याचा दावा
दरम्यान, जे पत्र माध्यमांमध्ये आले आहे, ते पत्र बनावट असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही, जी घटना माध्यमांमध्ये आली आहे, ती चुकीची आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.