26.2 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्र८४ वर्षांच्या शरद पवारांची पुन्हा भर पावसात सभा

८४ वर्षांच्या शरद पवारांची पुन्हा भर पावसात सभा

इचलकरंजी : प्रतिनिधी
सध्या विधासभा निवडणुकीचा प्रचारही अंतिम टप्प्यात असून शरद पवार यांची इंचलकरंजीत आज सभा पार पडली. या सभेतही पावसाने हजेरी लावली. यावेळी शरद पवार थांबले नाहीत. भर पावसातही त्यांनी आपले भाषण पूर्ण केले यामुळे २०१९ ला सातारा येथील सभेची पुनरावृत्ती होणार की काय अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची जाहीर सभा झाली होती. शरद पवार यांचे भाषण सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली मात्र शरद पवार यांनी भाषण थांबवले नाही. समोर उपस्थित लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन संपूर्ण भाषण ऐकले. या सभेची संपूर्ण देशभर चर्चा झाली आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये आज सभा पार पडली. महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या सभेसाठी शरद पवार इचलकरंजीमध्ये पोहोचले. सांगलीमधील रोहित पाटील यांच्यासाठी सभा पार पडल्यानंतर इचलकरंजीमध्ये शरद पवार मदन कारंडे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान पाऊस आणि शरद पवार यांचं समीकरण पुन्हा एकदा जुळून आलं. नेमका हाच धागा पकडत शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.

सभा आणि पावसाचे समीकरण विजयाचे
यावेळी बोलताना पवार यांनी पावसावरून जोरदार फटकेबाजी केली. समोर उपस्थित लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्रामध्ये अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो, असे शरद पवारांनी जाहीर सभेत बोलताच समोरून एकच जल्लोष झाला. कार्यकर्त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जोरदार प्रतिसाद देत शरद पवार यांच्या सभेत भर पावसातही जान आणली. या सभेचीही राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR