22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeमुख्य बातम्याग्राहकांच्या खात्यात अचानक ८५० कोटी

ग्राहकांच्या खात्यात अचानक ८५० कोटी

 सीबीआयची पुण्यासह ६७ ठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली/पुणे : देशातील मोठ्या सरकारी बँकेच्या ८५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने छापेमारी सुरु केली आहे. एकाच वेळी देशातील ६७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यात राजस्थानमधील जोधपूर, जयपूर, जालोर, नागौर आणि बाडमेरसह महाराष्ट्रातील पुणे येथील युको बँकेच्या शाखांचा समावेश आहे. या प्रकरणी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘आयएमपीएस’ द्वारे ग्राहकांच्या खात्यात ८५० कोटी रुपये वर्ग झाले होते.

सीबीआयने विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत १३० डॉक्यूमेंट्स, ४० मोबाइल, २ हार्ड डिस्क आणि एक इंटरनेट डोंगल जप्त केला आहे. तसेच सीबीआयने छापेमारी दरम्यान ३० संशयित व्यक्तींची चौकशी केली आहे.

मागील वर्षी १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान युको बँकेच्या ४१,००० खाते धारकांच्या खात्यात अचानक पैसे जमा झाले. सर्व खातेदारांची मिळून ही एकंदरीत रक्कम ८५० कोटी रुपये होती. ज्या बँक खात्यांमधून हा व्यवहार दाखवण्यात आला होता, त्यातून पैसे कापले न जाता युको बँकेच्या खात्यात पैसे दिसू लागले. त्यामुळे तपास यंत्रणांना धक्का बसला. हे सर्व व्यवहार केवळ आयएमपीएस द्वारेच होत होते. यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

खात्यात पैसे जमा होताच अनेक लोकांनी रक्कम काढून घेतली. या प्रकरणी युको बँकेकडून तक्रार देण्यात आली. त्यानंतर दोन अभियंते आणि इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयने त्या लोकांची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडून मोबाइल फोन, लॅपटॉप, कॅम्यूटर, डेबिट आणि क्रेडीट कार्ड जप्त करण्यात आले.

या प्रकरणी युको बँकेने स्वत: तक्रार केली होती. बँकेने आधी सांगितले की, हा अपहार सुमारे १.५३ कोटी रुपयांचा आहे. त्यानंतर बँकेने शेअर बाजाराला सांगितले की तांत्रिक बिघाडामुळे ही चूक झाली. त्यानंतर तांत्रिक बिघाडाचा फायदा घेत ई-मित्र ऑपरेटर आणि बँक कर्मचा-यांनी मिळून ८५० कोटी रुपये काढल्याचे उघड झाले. बँकेने ६४९ कोटी रुपये वसूल केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR