वॉशिंग्टन : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीची ओळख आज बावीसहून अधिक वर्षांनी पटली आहे. जॉन बॅलेन्टाइन निवेन (वय ४४) असे या व्यक्तीचे नाव असल्याचे न्यूयॉर्कच्या वैद्यकीय अधिका-यांनी जाहीर केले. जॉन हे एका विमा कंपनीचे कर्मचारी होते. त्यांचे कार्यालय वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या १०५ व्या मजल्यावर होते.
दहशतवाद्यांनी विमान धडकविल्याने इमारतीमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली आणि काही मिनिटांतच या गगनचुंबी जुळ्या इमारती कोसळल्या होत्या. या घटनेतील अनेक मृतांची ओळख त्याचवेळी पटली असली तरी जवळपास ४० टक्के जणांचे मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे असल्याने त्यांच्या अवशेषांवर विविध चाचण्या घेतल्या जात आहेत.
अवशेषांची डीएनए चाचणी घेतली जात असली तरी अवशेषांच्या २१,९०० तुकड्यांमधून व्यक्तीची ओळख पटविणे, हे अत्यंत जिकिरीचे काम असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. या हल्ल्यात सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी जॉन निवेन हे ओळख पटलेली अखेरचे व्यक्ती ठरले आहेत.
हौथी बंडखोरांवर अमेरिकेचे हल्ले
अमेरिकेने आज येमेनमधील हौथी बंडखोरांवर पाचव्यांदा हल्ला केला. या हल्ल्यात बंडखोरांची दोन जहाजभेदी क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आल्याचे अमेरिकेच्या अधिका-यांनी सांगितले. अमेरिका आणि ब्रिटनकडून संयुक्तपणे हे हल्ले सुरू असले तरी अद्यापही लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हौथींकडून होणारे हल्ले थांबलेले नाहीत.
जहाजांना लक्ष्य
इस्राईलशी संबंधित जहाजांवर हौथी बंडखोरांकडून हल्ले केले जात आहेत. आजही लाल समुद्रातून जात असलेल्या जहाजांना लक्ष्य करत बंडखोरांनी दोन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी सुरू केली असतानाच त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या अमेरिकेने तातडीने हल्ला करत ही दोन्ही क्षेपणास्त्रे नष्ट केली.