मुंबई (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शी आणि निर्भयी वातावरणात पार पाडण्यासाठी राज्याची निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी येथे दिली. भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य आयुक्तांनी अलीकडेच मुंबईत बैठक घेऊन सर्वसंबंधित विभागांना लोकसभा निवडणुकीत बेहिशेबी पैसे, अमली पदार्थ आदींचा वापर होणार नाही, याबाबत सूचना दिल्या आहेत. पुढील महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त मुंबईत येऊन निवडणूक तयारीचा आणखी आढावा घेतील, असेही देशपांडे यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने राज्यात घेण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ९ कोटींपेक्षा जास्त मतदार आपला हक्क बजावणार आहेत. ही संख्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २७ लाखांनी जास्त असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी मतदार याद्या अद्ययावतीकरण आणि त्याचे शुद्धीकरण हे महत्वाचे काम सुरू असते. राज्यात मुख्य निवडणूक अधिका-यांच्या कार्यालयाकडून २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत हे काम सुरू होते. त्यानंतर या कार्यालयाकडे आलेल्या माहितीनुसार २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७९ इतके नागरिक मतदानासाठी पात्र ठरले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा ८ कोटी ८५ लाख ६४ हजार ५३५ इतका होता, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यात २६ लाख ८० हजार १४४ मतदारांची भर पडली आहे. यामध्ये पुरूष, महिला आणि तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यंदा पुरूष मतदार ४ कोटी ७४ लाख ७२ हजार ३७९ असून गेल्यावेळीपेक्षा ११ लाख ५७ हजार १२८ ने पुरुष मतदारांची संख्या वाढली आहे. तर महिला मतदारांची संख्या ४ कोटी ३७ लाख ६६ हजार ८०८ इतकी असून २०१९ च्या तुलनेत महिला मतदारांची संख्या १५ लाख १९ हजार ९३० ने वाढली आहे. यंदा एकूण ५ हजार ४९२ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.
यंदा २४ लाख ३३ हजार ७६६ नव्या मतदारांची नोंदणी झाली असून दुबार नोंदणी अन्य कारणांमुळे २० लाख २१ हजार ३५० मतदारांची नवे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अंतिम यादीमध्ये ४ लाख १२ हजार ४१६ मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्याची मोहिम सुरूच राहणार असून वयाची १८ वर्ष वर्षे पूर्ण करणा-या नवमतादारांना निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारीखेच्या १० दिवस अगोदरपर्यंत या कार्यालयाकडे मतदार नोंदणी करता येणार असल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
२३ जानेवारी २०२४ पर्यंतची मतदारांची स्थिती
पुरुष मतदार…….. ४ कोटी ७४ लाख ७२ हजार ३७९
स्त्री मतदार…….. ४ कोटी ३७ लाख ६६ हजार ८०८
तृतीयपंथी … ५ हजार ४९२
मतदान केंद्रांची संख्या…. ९७ हजार ३२५