तेहरान : इराण आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. आता हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण दक्षिणपूर्ण इराणमध्ये बंदूकधारी हल्लेखोरांनी ९ जणांची हत्या केली आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी सांगितले की, इस्लामबादच्या राजदुतांनी मृतांची ओळख पाकिस्तानी नागरिकांच्या रूपात केली आहे.
इराणच्या मेहर वृत्तसंस्थेने सांगितले की, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी अज्ञात हल्लेखोरांनी सिस्तान बलुचिस्तान प्रांतातील सरावन शहरातील एका घरात नऊ बिगर इराणींची हत्या केली. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही समुहाने घेतलेली नाही. तेहरानमधील पाकिस्तानचे राजदूत मुहम्मद मुदस्सिर टीपू यांनी एक्सवर सांगितले की, सरावन येथे ९ पाकिस्तानी नागरिकांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने मला धक्का बसला आहे. पाकिस्तानी दूतावास पीडितांच्या कुटुंबीयांना पूर्णपणे साश देईल. याबरोबरच इराणला या प्रकरणात पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुमताज जहरा बलूत यांनी हा हल्ला भयानक आणि घृणित असल्याचे म्हणत त्याचा निषेध केला आहे. तसेच इराणी अधिका-यांनी घटनेची चौकशी करून याबाबत दोषी असलेल्यांना पकडण्याचे आवाहन केले आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह आणण्यासाठी पाकिस्तानी दूतावास पूर्ण प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. तसेच अशा हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात लढण्याच्या दृढसंकल्पाला धक्का बसणार नाही असेही त्यांनी सांगितले.