26.4 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरएकाच व्यक्तीच्या खात्यातून तब्बल ९०० कोटींचा व्यवहार

एकाच व्यक्तीच्या खात्यातून तब्बल ९०० कोटींचा व्यवहार

मर्जीतील अधिका-यांना आणून बीडमध्ये भ्रष्टाचार, आ. धस यांचा हल्लाबोल

बीड : प्रतिनिधी
आपल्या मनाप्रमाणे कारभार करण्यासाठी बीडमधून चांगल्या अधिका-यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिका-यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला. परळीत एका व्यक्तीच्या नावावर बँकेत ९०० कोटींचे हस्तांतरण झाले. यामागे परळीचा आका आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केला. महादेव बेटिंग अ‍ॅप भ्रष्टाचाराचा तपास केला असता तो मलेशियापर्यंत पोहोचेल, असा आरोपही त्यांनी केला. या संबंधी सर्व कागदपत्रे पोलिस अधीक्षकांना दिले असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.

आमदार सुरेश धस यांनी बीडचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. त्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. परळीमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर ९ अब्ज रुपयांचे बँक व्यवहार झाले आहेत. दुस-या एका व्यक्तीच्या नावावरही तसेच व्यवहार झाले. यावर कोणत्या यंत्रणेने तपास केला पाहिजे, परळीत दोन लोकांकडे मोठे घबाड आहे. अजून असे किती लोक असतील, याची माहिती घेतली पाहिजे, असे म्हटले.

महादेव अ‍ॅपद्वारे परळीत अब्जावधी रु. कमावले
महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून परळीतील लोकांनी अब्जावधी रुपये कमावले असून त्यांच्यामागे त्यांचा आका आहे. महादेव अ‍ॅपचा तपास केला असता त्याची लिंक ही परळीतून मलेशियापर्यंत पोहोचेल असे सुरेश धस म्हणाले. याच्या मागेसुद्धा आका आहे. बीडमधील कोणतेही प्रकरण घ्या, त्याच्यामागे एकच आका
आहे, असा आरोपही आमदार धस यांनी केला.

शेकडो एकर जमीन लाटली
बीडमधील आकाच्या बगलबच्च्यांनी जिल्ह्यातील तब्बल १४०० एकर गायरान जमिनीवर ताबा मिळवला. एका ठिकाणी ५० एकर जमीन घेतली. गरिबांच्या जमिनी लाटल्या. कुणाच्या नावावर किती जमीन आहे ते पाहा. १४०० एकरच्या जवळपास गायरान जमीन शिरसाळा गावात आहे. त्या ठिकाणच्या ६०० वीटभट्टयांपैकी ३०० वीटभट्टया अवैध जागेवर आहेत. देवीच्या मंदिरासाठी ८ एकर जागा होती. ती लाटली. बंजारा समाजाची जागाही लाटली. त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले. याची चौकशी करावी, असे आ. धस म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR