23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमक्का येथे उष्णतेच्या लाटेत ९०० भाविक ठार

मक्का येथे उष्णतेच्या लाटेत ९०० भाविक ठार

विक्रमी तापमान, यात्रेकरूंमध्ये हाहाकार

मक्का (सौदी अरेबिया) : वृत्तसंस्था
मुस्लिम समुदायासाठी पवित्र असलेल्या सौदी अरबमधील मक्का येथे उष्णतेने कहर केला आहे. वाढत्या तापमानाच्या झळा जगभर बसत असताना यावेळी हज यात्रेसाठी गेलेल्या ९०० हून अधिक यात्रेकरुंना या भयानक उष्णतेने आपला जीव गमवावा लागला. यामध्ये ६८ भारतीयांचा समावेश आहे. १२ ते १९ जूनदरम्यान झालेल्या या यात्रेत ५१.८ अंश इतकी रेकॉर्डब्रेक उष्णता नोंदविण्यात आली. याचा फटका जगभरातून मक्कामध्ये आलेल्या मुस्लिम यात्रेकरूंना बसला.

सौदी अरेबियामधील मक्का येथे या पवित्र यात्रेसाठी जगभरातील १९ लाख लोक सहभागी झाले होते. आयुष्यात एकावेळी मक्कामध्ये आले पाहिजे, ही जगभरातील मुस्लिमांची धार्मिक श्रद्धा असते. अनेक अबाल, वृद्ध मक्कातील जीवघेण्या उष्णतेत धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी आले होते. यापैकी ९०० हून अधिक लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या मृत्यूच्या तांडवाने मक्का परिसरात हाहाकार उडाल्याचे सांगितले जात आहे. लोक जिकडे तिकडे आपल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी रुग्णालयांत गर्दी करत आहेत. तसेच समाजमाध्यमांवरही लोक तेथील जीवघेण्या परिस्थितीत आपल्या प्रियजनांसाठी मदतीची याचना करत आहेत.

मृतांमध्ये ६८ भारतीय
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी व सौदी अरेबियातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या मृतांमध्ये ६८ भारतीयांचा समावेश आहे. यातील काही मृत्यू हे नैसर्गिक होते. यात्रेमध्ये अनेक वृद्धांचाही समावेश होता. वाढत्या उष्णतेच्या लाटेचा यात्रेकरूंना मोठ्या झळा सोसाव्या लागल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR