मुंबई : प्रतिनिधी
लोकसभेची तुतारी फुंकल्यानंतर निवडणूक प्रचाराला धार आली आहे. त्यासोबतच राजकीय पक्षांना खर्चाच्या मर्यादेची जाणीव निवडणूक आयोगाने करून दिली. खासदारकीच्या या आखाड्यात उमेदवाराला खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
दरम्यान, २०२४ च्या प्रचाराचे रणशिंग फुंकले गेले आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात प्रचाराला धार आली आहे. प्रचारकार्यातील खर्चासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने वस्तूंच्या किमतींची यादी आणि उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा जाहीर केली आहे.
यामध्ये चहा, कचोरी, समोसा यासह जवळपास २०० वस्तूंचा सहभाग आहे. त्याअंतर्गत राजकीय पक्षांना खर्च करताना लक्ष ठेवावे लागेल. त्यानुसार चहा, समोसा १० रुपये तर कॉफी आणि शीतपेयासाठी १५ रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. तर १०० रुपयांत शाकाहारी थाळी, १८० रुपयांत मांसाहारी थाळीचा खर्च करता येईल. इतर अनेक खर्चाची यादीच निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक प्रचारात खर्च होणारी ही रक्कम निवडणूक खर्चात जोडण्यात येईल.
एका लोकसभा मतदारसंघात उमेदवाराला जास्तीत जास्त ९५ लाख रुपयांचा खर्च करता येईल. या रकमेत इतर वस्तूंमध्ये मायक्रोफोन, लाऊडस्पीकर, अॅम्प्लीफायर, वाहन, बॅनर, खुर्ची, सोफा सेट, दिवा, पंखे, चटई, फुलदाणी, फुलाचे हार, तंबू, पाणी, जनरेटर सेट, ड्रोन कॅमेरा यांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून नाष्टा, स्नॅक्स, शाकाहारी आणि मांसाहारी थाळीसाठीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्याची एक यादीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, पिण्याच्या पाण्याची बॉटल, बिस्किटच्या किमती एमआरपी आधारित असतील. याशिवाय कचोरी १५ रुपये, सँडविच २५ रुपये आणि जिलेबी ९० रुपये प्रति किलो मिळेल. निवडणूक आयोगाने २०० वस्तूंची एक यादीच जाहीर केली आहे.
निवडणूक अधिका-यांची परवानगी आवश्यक
उमेदवाराला कोणताही कार्यक्रम घेण्यापूर्वी स्थानिक निवडणूक अधिका-याची परवानगी घ्यावी लागणार आहे. निवडणूक विभाग विविध कार्यक्रम, जाहीर सभा यांची रेकॉर्डिंग आणि खर्चाचे विश्लेषण करणार आहे. त्यासाठी एक टीम पाठवते. ही टीम उमेदवार खर्चाची मर्यादा पालन करत आहेत की नाही यावर लक्ष ठेवते.
वाहनांवरील खर्चाची मर्यादा निश्चित
प्रचारात वाहन वापरासाठीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. दुचाकीचे भाडे रोज ३०० रुपयांचा खर्च, तर ई-रिक्षासाठी ६०० रुपये किराया हा दर आहे. होंडा सिटी आणि टाटा सफारीसारख्या एसयूव्हीचे भाडे ३,००० रुपये प्रति दिवस निश्चित करण्यात आले आहे. टोयोटा इनोव्हा, फॉर्च्युनरसारख्या वाहनांसाठीचे भाडे ३,००० रुपये असेल. तर पेजेरो वाहनासाठी प्रति दिवस ३,२०० रुपयांच्या खर्चाची मर्यादा निश्चित आहे.