सालियन प्रकरणात पेनड्राईव्हची एन्ट्री!
दोन माजी पोलिस अधिका-यांनी दिला पेनड्राईव्ह
मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. यात आमदार आदित्य ठाकरे, अभिनेता दिनो मौर्या यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप केले. यावरून राजकीय वातावरण तापले. त्यानंतर आज या प्रकरणात थेट पेनड्राईव्हची एन्ट्री झाली. त्यामुळे यात नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
मुंबईच्या दोन माजी सहाय्यक पोलिस आयुक्तांनी दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांची आज भेट घेतली आणि त्यांनी दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित माहितीचा पेनड्राईव्ह वकिलाला दिला. त्यांच्या या भेटीचा फोटोदेखील समोर आला आहे. या भेटीवेळी दिशा सालियनचे वडील सतीश सालियनदेखील तिथे होते, अशी माहिती समोर येत आहे. ए. पी. निपुंगे आणि भीमराज घाडगे अशी या दोन माजी सहाय्यक पोलिस आयुक्तांची नावे आहेत. त्यांनी वकील निलेश ओझा यांना पेनड्राईव्ह दिल्याची माहिती आहे. या पेनड्राईव्हमध्ये दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित माहिती असल्याचा दावा केला जात आहे.
ऐन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या टप्प्यात दिशा सालियन प्रकरण समोर आले. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. त्यामुळे या मुद्यावरून विधिमंडळात गदारोळ झाला. शिंदे सेना आणि भाजपच्या सदस्यांनी खास आमदार आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करीत आरोपाच्या फैरी सुरू केल्या. त्यामुळे चांगलेच राजकारण तापले आहे. आता या प्रकरणाची नव्याने चौकशी होत आहे.
नवे खुलासे होणार?
संबंधित पेनड्राईव्हमध्ये फोटो, व्हिडीओ रेकॉर्डिंग, स्टिंग ऑपरेशन फुटेज आणि इतर महत्त्वाचे दस्तावेज असल्याची चर्चा आहे. हे सर्व पुरावे मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर आरोपींच्या विरोधात असल्याची चर्चा आहे. या पेनड्राईव्हमुळे दिशा सालियन प्रकरणात काही नवे खुलासे होतात का, ते पाहणे महत्त्वाचे आहे.