ताडकळस : ताडकळस व परिसरातील हरभरा, तूर पिकावर अतिवृष्टी, ढगाळ वातावरण, धुक्यामुळे अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. चिकटा, सोसाट्याचा वारा, जोरदार पाऊस आदी कारणामुळे पिके हातची गेली आहेत. शेतकरी संकटाची मालिका सहन करत हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे ताडकळस परीसरातील हरभरा पिके करपली आहेत.
या वर्षी अल्पश: पावसावरही ज्वारी, हरभरा, गहू पिके उगवली. मात्र जोरदार पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेला कापुस, तुर जमिनीवर सपाट पडल्याने मोठे नुकसान झाले. तुरीला वातावरणातील बदलांमुळे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यात भरलेल्या शेंगा अळीने खावुन टाकल्याने तालुक्यातील सहा मंडळातील २०८६ हेक्टरवरील तुर, ८६८६ हेक्टरवरील हरभरा पुर्णपणे करपून गेला आहे. पावसाच्या अवेळी पडण्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.शासनाने पंचनामे करून नुकसान १०० टक्के असताना भरपाई २५ टक्के देत असल्याने आत्महत्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे.
मागील वर्षी पावसाचा खंड २३ दिवस असल्याने पिके करपून गेली, कोरडा दुष्काळ झाला. मात्र पिक विमा अग्रीम २५ टक्के दिली. आता तुर, कापूस, हरभरा पूर्ण हातचा गेला. भरपाईचे आश्वासप्ना देवूनही प्रत्यक्षात काहीच नाही मिळाले. खर्च दुप्पट उत्पन्न काहीच नाही अशी अवस्था झाली असल्याचे प्रगतशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांनी सांगितले.
दरम्यान तुर, हरभरा, कापुस पिकांचे पंचनामे करणे सुरु आहे. येत्या दोन दिवसात ते पूर्ण होतील. प्रस्ताव सादर केल्यावर नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती पूर्णा तालुका कृषी आधिकारी निलेश अडसूळे यांनी दिली आहे.