बीड : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात बोगस पीक विमा भरल्याचे प्रकार समोर येत आहेत. धक्कादायक म्हणजे चक्क शासकीय जागेवर विमा काढल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे रबी हंगामात ज्या शेतक-यांनी पिक विमा भरला आहे, त्यांना नुकसान भरपाई मिळेल. पण बोगस पीक विमा भरणा-यांचे अर्ज बाद करण्याचे आदेश कृषी विभागाने विमा कंपनीला दिले.
बीड जिल्ह्यात रबी क्षेत्रावर सव्वातीन लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, यामध्ये पाच लाख हेक्टर क्षेत्राचा पीक विमा भरल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पीक विमा घोटाळ््याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग अलर्ट झाला आहे. बीड जिल्ह्यात खरीप हंगामात शासकीय जमिनीचा पीक विमा भरून अनेकांनी शासनाची फसवणूक करीत पीक विमा उचलला. आता रबी हंगामातही पिकाची पेरणी नसताना अनेक शेतक-यांनी पीक विमा भरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शेतात पिकांची लागवड नसतानाही विमा भरणा-या शेतक-यांचे अर्ज रद्द करण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले.
दरम्यान, बीडच्या नगर परिषदेची जागा गायरान जमीन दाखवून त्यावर तेलंगणातील एका शेतक-याने पीक विमा भरल्याची बाब समोर आली होती. आता रबी हंगामात देखील असेच प्रकार समोर येत आहेत.
जिल्ह्यात पीकविमा घोटाळ््याचे रॅकेट
दरवर्षी अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे होणारे नुकसान लक्षात घेता सरकारने १ रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती. मात्र, याचाच फायदा घेत काही भामट्यांनी बोगस पीक विमा भरून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्यात असे अनेक प्रकरण समोर आले. एवढेच नव्हे, तर माजलगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ९४ एकर जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून पीकविमा काढला होता. त्यामुळे जिल्ह्यात पीकविम्याचे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे.