चाकूर : प्रतिनिधी
तहसील कार्यालयाच्या जवळ असलेल्या शासकीय निवासस्थानांमधील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह सहा कर्मचा-यांंच्या घरी चोरट्यांनी चोरी केली आहे. तहसील कार्यालयाच्या जवळ शासकीय निवासस्थानात विविध विभागाचे चाळीस अधिकारी व कर्मचारी राहतात. शनिवारी व रविवार या दोन दिवसांची सुट्टी आल्यामुळे अनेक जण कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शनिवारी रात्री शासकीय निवासस्थानात प्रवेश केला व ज्याच्या घराला कुलुप नाही त्याचे दरवाजे बाहेरून बंद केले. ज्या घरांना कुलूप लावलेले होते त्या घरात चोरट्यांंनी हात साफ केला.
याठिकाणी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या घरी चोरट्यांंनी चोरी केली. सकाळी कर्मचा-यांंना ही घटना लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले. या निवासस्थानी तीन पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचारी राहतात. तरीही चोरट्यांंनी याठिकाणी चोरी केली असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी भेट देऊन श्वानपथक व ठसे तज्ञाला बोलावले होते.काही घरातून चोरट्यांंनी सोने, चांदीने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहै. या घटनेची नोंद चाकूर पोलीस ठाण्यात झाली असून तपास चाकूर पोलीस हे करीत आहेत.