पुणे: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये प्रवाशांना तिकिटाची रक्कम ऑनलाइन देता येणार आहे. महामंडळाने प्रवाशांना ‘क्यूआर कोड’च्या मदतीने तिकिटाचे पैसे देण्याची सोय केली आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार असून, त्याचा फायदा प्रवाशांबरोबरच महामंडळालाही होणार आहे. एसटीच्या पुणे विभागातील सर्व आगारांमधून धावणा-या एसटी बसमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे.
सध्याच्या जमान्यात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. चहावाल्यापासून ते मॉलपर्यंत सर्वत्र ग्राहक ऑनलाइन पैसे देतो. सर्व व्यवहारांत कॅशलेसवर भर देण्यात येत असताना एसटीचे तिकीट रोख रक्कम देऊनच काढावे लागत होते. त्यामुळे वाहक आणि ग्राहकांची सुट्ट्या पैशांवरून सातत्याने वादावादी होत होती. हे टाळण्यासाठी एसटीने पहिल्या टप्प्यात ‘क्यूआर कोड’च्या मदतीने तिकीट देण्याची सोय केली आहे.
पुढील टप्प्यात प्रवाशांना डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून तिकीट काढण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. या प्रयत्नांमुळे वाहकांचीही रोख रक्कम सांभाळण्यापासून सुटका होणार आहे. महामंडळाने सर्व विभागांना ही सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.