पालम : येथील १९९१ साली दहावी इयत्तेत असलेले जिल्हा परिषद प्रशाला व ममता विद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्नेहमीलन रविवार, दि.१० डिसेंबर रोजी पार पडले. तब्बल ३२ वर्षानंतर हे विविध क्षेत्रातील वर्गमित्र भेटल्याने त्यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता.
पालम येथील गजानंद मंगल कार्यालयात या स्नेहमीलनाचे आयोजन करण्यात आले. सर्व वर्गमिञ-मैञीणींनी एकत्र येवून नाष्ता केल्यानंतर विद्यार्थी शिस्तीत वर्गात दाखल झाले. प्रत्येकाचे गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले. नंतर सरस्वती पूजन करून शाळेतील प्रार्थना म्हणत सर्वांचा परिचय करुन घेण्यात आला. मिना सोळंके (कदम) यांनी प्रवेशद्वारासमोर काढलेल्या भव्य रांगोळीचे सर्वांनी कौतुक केले.
स्नेह संमेलनात शिक्षकवृदांना आमंत्रित करून त्यांचा यथोचित शाल, श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. स्नेहमीलनाला जिल्हा परिषद व ममता शाळेतील जवळपास १०० वर्गमित्र-मैञीणींनीसह १० शिक्षकांनी उपस्थिती लावत संपुर्ण दिवस उत्साहात घातला. सुञसंचालन गजानन गडम यांनी तर प्रार्थना मनोज देशपांडे यांनी घेतली. सतीश मुंदडा यांची असिस्टंट कमिशनरपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल व बालासाहेब सिरस्कर यांची प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार गुरूजनांहस्ते करण्यात आला. या प्रसंगी जयश्री देशमुख, उर्मिला लोढा, मुंजाभाऊ रोकडे, बालासाहेब सिरस्कर यांच्यासह इतर वर्गमित्रांनी मनोगत व्यक्त केले. दुपारी ३ वाजेपर्यंत चाललेल्या या सदाबहार स्नेहमीलन कार्यक्रमानंतर सुग्रास जेवणावर सर्वांनी ताव मारत पुढच्या वर्षीचे नियोजन ठरवत वैयक्तीक भेटी-गाठी, फोटोशेशन करत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
सर्वांना या पहिल्या स्नेहमीलनाची आठवण रहावी म्हणून सतीश मुंदडा यांनी प्रत्येकाला एक घड्याळ भेट दिले. या स्नेहमीलनात परभणी, लातूर, नांदेड, मुंबई, पुणे, संभाजीनगर, जालना, अकोला अशा ठिकाणी स्थायिक झालेले वर्गमित्र सामिल झाले होते. या स्नेहमीलनासाठी सतीश मुंदडा, निखिल पारख, गजानन गडम, जयश्री देशमुख, मिना कदम, मुंजाभाऊ रोकडे, सतीश दरक, आनंता पौळ, शरद देशमुख, गुणवंत सराफ यांनी विशेष परिश्रम घेतले.