अक्कलकोट : अक्कलकोट
तालुक्यात विविध ठिकाणी सोलर प्लांट सुरू असले, तरी रात्रीच्या वेळी विनापरवाना बेकायदेशीरपणे मोठमोठ्या जुन्या झाडांची कत्तल केली जात असून, याठिकाणी स्थानिकांना काही रोजगार मिळत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तालुक्यातील सोलर प्लांट हसापूर, कोन्हाळी, बॅगेहळ्ळी, चप्पळगाववाडी, वळसंग, आचेगाव, दर्शनाळ अशा विविध गावांच्या शिवारात हजारो एकर जमीन स्थानिक शेतकऱ्यांकडून कवडीमोलाने खरेदी करून भाडेतत्त्वावर घेऊन कामे सुरू आहेत.
या जमिनीतून जुन्या काळातील मोठमोठे चिंच, कडूलिंब, बोर, आंबा अशा विविध प्रकारची झाडे तोडली जात आहेत. ही झाडे तोडण्यासाठी रितसर परवाना घेणे आवश्यक असते.मात्र, कुठल्याही प्रकारचा परवाना न घेता शेतातील सर्व झाडांचे रातोरात कत्तल केली जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
एखादा नवीन प्रकल्प आल्यानंतर
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळणे आवश्यक असते. तालुक्यातील हजारो युवक शिक्षण घेऊन बेकार आहेत. अशाप्रसंगी परप्रांतीय तरुणांना नोकरी दिली जात आहे. रोजगारसुद्धा परराज्यातून मागविला जात आहे. यामुळे स्थानिकांना कुठल्याच प्रकारचा फायदा होत नसल्याचा रोष आहे. यामुळे स्थानिकांमधून सोलार कंपनीविरुद्ध रोष वाढत आहे.
सोलर प्लांटच्या क्षेत्रावरील मोठ्या प्रमाणात झाडे विनापरवाना तोडली जात आहेत. दिवसा विरोध होत असल्याने रात्रीच्या वेळी तोडली जातात. स्थानिकांना रोजगार न देता परप्रांतीय तरुणांची भरती केली जात आहे. स्थानिक ग्रामपंचायतीला कर भरणे आवश्यक असताना तो दिला जात नाही. यामुळे कंपनी व ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांच्यात वादविवाद होत आहेत. आतापर्यंत ग्रामस्थांनी अनेक निवेदने, तक्रारी पोलिस ठाणे, तहसील कार्यालय येथे दिल्या आहेत.असे बॅगेहळ्ळीच्या सरपंच इंदुबाई माशाळे यांनी सांगीतले.