मंगळवेढा : लग्नात आणखीन १० तोळे सोने देतो असे तुझ्या चुलत्याने शब्द दिला होता. त्या प्रमाणे हुंड्यातील सोने दे असे म्हणून एका विवाहित २१ वर्षीय तरुणीचा शारिरीक व मानसिक छळ करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पती आण्णासाहेब मोरे, सासू अलका मोरे, सासरे सेवानिवृत्त प्राध्यापक सिध्देश्वर मोरे, नणंद सोनाली सतिश जाधव (रा. ढवळस ता. मंगळवेढा) या चौघाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी सुरेश घाडगे (रा. देगाव ता. पंढरपूर) हे मयत काजल आण्णासाहेब मोरे (वय २१वर्षे रा. ढवळस) ही त्यांची पुतणी असून तिचा विवाह २५ एप्रिल २०२१ रोजी ढवळस येथील आण्णासाहेब सिध्देश्वर मोरे या मुलाबरोबर झाला होता. लग्नामध्ये हुंडा म्हणून त्यांच्या मागणीनुसार ११ तोळे सोने मुलाच्या अंगावर घालावयाचे ठरले होते. त्या प्रमाणे फिर्यादीकडून ११ तोळे सोने घातले गेले. मात्र लग्न घटिका जवळ आल्यानंतर लग्न थांबवून आरोपीने अजून दहा तोळे सोने हुंडा म्हणून मागणी केली. त्यामुळे फिर्यादीकडील मंडळी व आरोपीकडील मंडळी यांच्यात वाद झाला होता. तदनंतर मुलीकडील मंडळींनी पैसे देवू असे म्हणून समजूत घातली होती.
लग्न झाल्यानंतर मयत काजल ही पहिल्या दिवाळीला माहेरी आली तेव्हां तिने सांगितले की, वरील सर्व आरोपी मंडळी लग्नात तुझे चुलते दहा तोळे देतो असा शब्द दिला होता. प्रमाणे त्यांनी सोने दिले नाही. त्यामुळे ते नेहमी मला मारहाण करुन उपाशीपोटी खोलीत कोंडून ठेवतात, शिवीगाळी करतात त्यामुळे मला मानसिक त्रास देत असल्याचे काजल हिने सांगितले होते. तदनंतर काजल हिच्या माहेरकडील मंडळीने ढवळस येथे येवून वरील आरोपींना काजल हिला त्रास देवू असे समजावून सांगितले. होते. तसेच परवाच्या दिवाळीला येताना काजल बिगर पैशाची आली तर आम्ही तुला मारुन टाकणार आहे असे म्हणाले होते.
ही गोष्ट मयत काजल हिने तिच्या मैत्रिणी जुलेखा जावेद शेख, अर्शिया आशपान शेख (रा. देगाव) यांच्याजवळ बोलून दाखविले होते. आरोपींनी मयत काजल हिला अटॅक आला असून तुम्ही लवकर या असे मयताच्या माहेरी भ्रमणध्वनीवरुन कळविले. फिर्यादी सुरेश घाडगे हे ढवळस येथे सकाळी १० वाजता आल्यावर काजल ही घराच्या वरचे खोलीमध्ये मृत अवस्थेत बेडवर होती. तिच्या गळ्यावर व्रण दिसून आल्याने फिर्यादीच्या लक्षात आले की, पती, सासू, सासरा, नणंद यांच्या त्रासाला कंटाळून फॅनला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.