नागपूर : मला गोळी घालून ठार मारण्याची धमकी आली आहे. माझ्या मागेपुढे पोलिसांची फौज आहे. पण तरीही मी मॉर्निंग वॉकला जाणं बंद केलं आहे. मॉर्निंग वॉकला जाऊ नका, असा मला सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. माझ्यावरील केसचा आणि मला आलेल्या धमक्यांचा काय संबंध आहे? मी कशाला खोटं सांगू? कोर्ट काही त्यांच्यासारखे (मनोज जरांगे पाटील) मूर्ख नाही. केस केसच्या ठिकाणी आणि बाकीच्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी हे कोर्टालाही माहीत आहे, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला आहे.
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मी गेल्या ३५ वर्षांपासून ओबीसींची लढाई लढत आहे. दिल्लीचे रामलीला मैदान, पटनाचे गांधी मैदान आणि पुण्याच्या एसपी मैदानात प्रचंड मोठ्या रॅली मी काढल्या आहेत. मी ओबीसींसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढतोय. आजच ही लढाई सुरू केलेली नाही. हे सर्व जगालाही माहीत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.
भुजबळांच्या कॉलेजजवळ जमा होण्याचे मेसेज फिरत आहेत. याचा अर्थ बीडला झाले तसे करण्याचा प्रयत्न आहे. माझ्यावर फायरिंग केली जाईल असे मला माझ्या लोकांकडून कळले. सीआयडीकडून पोलिसांना माहिती दिली गेली. मी असल्या गोष्टींना अनेकदा तोंड दिले आहे. त्यामुळे मी धमक्यांना घाबरत नाही, असे सांगतानाच मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही हे पुन्हा सांगतोय. फक्त ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, एवढेच आमचे म्हणणे आहे, असे भुजबळ म्हणाले.