28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरअवकाळी बाधीत शेतकर्‍यांना नुकसानभरपाईसाठी शासनाला प्रस्ताव

अवकाळी बाधीत शेतकर्‍यांना नुकसानभरपाईसाठी शासनाला प्रस्ताव

सोलापूर : जिल्ह्यात २६ ते ३० नोव्हेंबर या काळातील वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अक्कलकोट वगळता इतर १० तालुक्यांमधील ४९ हजार ८० शेतकऱ्यांच्या ३५ हजार ५१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून तालुक्याकडून त्यासंबंधीचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांसाठी ५९ कोटी १५ लाख १८ हजार ७३५ रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.

अवकाळीने बाधित उत्तर सोलापूर तालुक्यातील एक हजार ५३४ शेतकऱ्यांना एक कोटी ७६ लाख ५४ हजार २०० रुपयांची भरपाई अपेक्षित आहे. तसेच बार्शीतील नऊ हजार ४९२ शेतकऱ्यांना १५ कोटी १४ लाख आठ हजार ८३५ रुपये, दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन हजार ९९७ शेतकऱ्यांसाठी पाच कोटी २० लाख ७३ हजार १५० रुपये, अप्पर मंद्रूप परिसरातील ११ हजार ८० शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ४३ लाख ९९ हजार २० रुपये, माढ्यातील सात हजार ३०६ शेतकऱ्यांना सात कोटी ७८ लाख ५० हजार रुपये, करमाळा तालुक्यातील १६ शेतकऱ्यांना पाच लाख आठ हजार ५०० रुपये, पंढरपूर तालुक्यातील चार हजार ६०९ शेतकऱ्यांना सहा कोटी ९६ लाख ११ हजार रुपयांची भरपाई मिळावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावात नमूद आहे.

मोहोळ तालुक्यातील ४६ शेतकऱ्यांसाठी पाच लाख १७ हजार ५०० रुपये, मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक १० हजार ५३५ शेतकऱ्यांना दहा कोटी सात लाख दोन हजार १०० रुपये, सांगोल्यातील २५० शेतकऱ्यांना ४१ लाख दोन हजार ९८० रुपये आणि माळशिरस तालुक्यातील २१५ शेतकऱ्यांना २६ लाख ९१ हजार ४५० रुपयांची भरपाई अपेक्षित आहे. आता राज्य सरकारकडून अवकाळीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत भरपाई मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्तर सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, माढा, करमाळा, मोहोळ, सांगोला व माळशिरस या तालुक्यांमधील जिरायती क्षेत्रांवरील पिकांचे अवकाळीमुळे काहीही नुकसान झाले नाही. तर अक्कलकोट व मोहोळ या दोन्ही तालुक्यातील बागायती क्षेत्राचेही नुकसान झालेले नाही. दुसरीकडे अक्कलकोट वगळता सर्वच तालुक्यांमधील फळबागांनाच अवकाळीचा फटका बसल्याचेही अहवालात नमूद आहे. करमाळा, मोहोळ, सांगोला व माळशिरस तालुक्यांमधील फळबागांचे इतर तालुक्यांच्या तुलनेत कमीच आहे. करमाळा, मोहोळ, सांगोला व माळशिरस या चार तालुक्यांमधील फळबागांचेही नुकसान कमीच झाल्याचे पंचनामा अहवालात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR