नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सिसोदिया यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. ३० ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मद्य धोरण प्रकरणात सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला होता. या आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी ते करत होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी २९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ३० ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला होता, कारण तपास यंत्रणा ३३८ कोटी रुपयांचा व्यवहार सिद्ध करू शकली होती. सध्या त्यांना जामीन मिळू शकत नाही. कनिष्ठ न्यायालयातील खटला ६ महिन्यांत पूर्ण न झाल्यास पुन्हा जामिनासाठी अर्ज करता येईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.