सोलापूर : साहेब, पावसाअभावी खरीप गेले, रब्बी पेरणीही नाही, खायचं काय? अशी व्यथा डोळ्यांत अश्रू आणून शेतकऱ्यांनी मांडली. माळशिरस, सांगोला तालुक्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा व करमाळा या पाच तालुक्यांसह उर्वरित तालुक्यांमधील ४५ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर झाला आहे. केंद्र शासनाकडून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. तत्पूर्वी, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केंद्रीय पथकाकडून केली जाते. या पथकाने माळशिरस व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त काही गावांना भेटी दिल्या. सर्वप्रथम सुळेवाडी (ता. माळशिरस) गावातील सुनील हाके यांच्या शेतातील तुरीची पाहणी केली.
त्यानंतर दयानंद कोळेकर यांच्या विहिरीतील पाणीपातळी पाहिली. तसेच शिंगोणींत मक्याची पाहणी केली. तर सांगोला तालुक्यातील आचकदणी, महूद बुद्रुक येथील पिकांचीही पाहणी केली. या पथकात केंद्राच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिवा सरोजिनी रावत यांचा समावेश आहे.
या पाहणीवेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, माळशिरसचे प्रातांधिकारी नामदेव टिळेकर, माढ्याच्या प्रांताधिकारी ज्योती आंबेकर, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, कृषी विकास अधिकारी पी.के. वाघमोडे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता धीरज साळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ. समीर बोरकर, वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण अधिकारी एम.ए. जे. शेख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन.एस. नरळे आदी उपस्थित होते.
केंद्रीय पथकाने पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची पाहणी केली. पाझर तलाव, शेतातील कोरड्या पडलेल्या विहिरी, सध्याची पाण्याची व्यवस्था, जनावरांच्या चाऱ्याची स्थिती, खालावलेली पाणीपातळी, तूर, मका, ज्वारी, ऊस व अन्य पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पावसाअभावी पीकं डोळ्यादेखत गेली, ओल नसल्याने रब्बीची पेरणीही करता आली नाही, पेरणी केलेले उगवलेही नाही. पाणीपातळी खालावली, काही विहिरी कोरड्या पडल्या, आता खायचे कसे हा प्रश्न आहे. दुष्काळाची मदत लवकर मिळावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी पथकाकडे केल्याचेही पहायला मिळाले.