टेंभुर्णी, : शेतीच्या कारणावरुन पुतण्याने चुलत्याच्या गळ्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी शिवाजी बाबासाहेब जाधव (वय २७) यास अटक करून माढा न्यायालयात हजर केले असता सोमवार (ता. १८) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश माढ्याचे न्यायदंडाधिकारी जी. व्ही गांधे दिले आहेत.
या प्रकरणातील चारपैकी दोन संशयितांना पकडण्यात टेंभुर्णी पोलिसांना यश आले असून उर्वरित दोघे अद्यापही फरार आहेत. शेवरे (ता. माढा) येथील कुरण वस्तीवरील शंकर प्रल्हाद जाधव (वय ६५) यांचा शेतीच्या कारणावरुन त्यांच्या पुतण्यांनी निर्घृण खून केला. त्यांचे शीर धडवेगळे करून ते सोबत घेऊन गेले होते. या प्रकरणी शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, अजित बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव (सर्व रा. कुरणवस्ती, शेवरे) या चौघांविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आकाश जाधव यास पकडून टेंभुर्णी पोलिसांच्या स्वाधीन केले. माढा न्यायालयाने त्यास सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिवाजी जाधव हा अकलूज पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. टेंभुर्णी पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी करून अटक केली. माढा न्यायालयात शिवाजी जाधव यास हजर केले असता त्यालाही सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश माढा न्यायालयाने दिले आहेत.
या गुन्ह्यातील परमेश्वर जाधव व अजित जाधव हे दोघे संशयित अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील दोन्ही संशयितांना लवकच अटक करण्यात येईल असे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीश जोग यांनी सांगितले.