22.1 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeसोलापूरसोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पिंपळे यांच्या रूममध्ये दारूची बाटली, गुटख्याची पुडी

सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पिंपळे यांच्या रूममध्ये दारूची बाटली, गुटख्याची पुडी

सोलापूर – राष्ट्रीय शीतसाखळी स्रोत केंद्र, पुणे येथे आयोजित कार्यशाळेस उपस्थित राहण्यासाठी गेलेले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे यांच्या रूममध्ये दारूची बाटली, ग्लास व गुटख्याची पुडी आढळून आली होती. आता तब्बल दोन महिन्यांनंतर याची चौकशी सुरू झाली असून चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांना दिल्या आहेत. या प्रकाराने जिल्हा परिषद आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय शीतसाखळी स्रोत केंद्र, पुणे येथे आयोजित प्रशिक्षण कालावधीत डॉ. पिंपळे यांना शासकीय रूम देण्यात आली होती. डॉ. पिंपळे यांना देण्यात आलेल्या या रूममध्ये दारूची बाटली, दारू पिल्याचे ग्लास आणि गुटखा आढळून आला आहे. या गैरप्रकाराबाबत राष्ट्रीय शीतसाखळी स्रोत केंद्र, पुणे यांच्याकडून वरिष्ठ कार्यालयास पत्र पाठवून तक्रार करण्यात आली. त्यानंतर या संदर्भात आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. अंबाडेकर यांनी चौकशी करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या लेखी सूचना डॉ. नवले यांना दिल्या आहेत.

वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पिंपळे यांना नोटीस बजावण्यात आली असून म्हणणे देण्यासाठी त्यांना सात दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. डॉ. पिंपळे यांच्याकडून नोटिशीसंदर्भात खुलासा प्राप्त झाल्यानंतर तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले.

या प्रकाराशी आपला काडीमात्र संबंध नाही. तब्बल दोन महिन्यांनंतर हा प्रकार उघड होतो. यासंदर्भात आपणास विचारणा होते. या सर्व बाबी संशयास्पद आहेत. याबाबत आपल्याला नोटीस प्राप्त झाली असून या नोटिशीला आपण उत्तर देऊ, असे स्पष्टीकरण डॉ. पिंपळे यांनी दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR