धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा टमटम अपघातात मृत्यू झाला. हा अपघात तेर ते हिंगळजवाडी रस्त्यावर झाला. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाणे येथे १३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगळजवाडी ता. धाराशिव येथील मयत झालेले ज्येष्ठ नागरिक शिवाजी मारुती भोसले हे टमटममध्ये बसून जात होते. तेर ते हिंगळजवाडी रस्त्यावर टमटम उलटल्याने अपघात झाला. टमटम चालकाने त्याचे ताब्यातील टमटम हा भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवल्याने टमटम पलटी होवून अपघात झाला. या अपघातात टमटम मधील शिवाजी भोसले हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर इतर प्रवाशी लोक हे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी मयताचा मुलगा सतिश शिवाजी भोसले यांनी दि. १३ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) सह १८४ मोवाका अन्वये ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.