16.7 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमहाराष्ट्रसलिम कुत्ता प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी

सलिम कुत्ता प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी

नागपूर : प्रतिनिधी
मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा ‘राईट हॅण्ड समजला जाणारा सलिम कुत्ता पॅरोलवर असताना नाशिकमध्ये शिवसेनेचे (ठाकरे गट) महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पॅरोल संपण्याच्या पूर्वसंध्येला केलेल्या पार्टीत कोण कोण होते, कुणाचा काय संबंध, वरदहस्त कुणाचा याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

भाजपचे नितेश राणे यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर माहितीच्या मुद्यांतर्गत कुत्ताच्या पार्टीत बडगुजर सहभागी झाल्याची माहिती सभागृहात दिली. मुंबईतील बॉम्बस्फोत २५७ निष्पाप लोकांचे बळी गेले. ७०० हून अधिक जखमी झाले. सेनाभवन उडवण्याचा प्रयत्न झाला. यातील आरोपी सलिम कुत्ता हा जेलमधून पॅरोलवर बाहेर आला. पॅरोल संपण्याच्या एक दिवस आधी झालेल्या पार्टीत कुत्तासोबत सुधाकर बडगुजर होते. कुत्ताचा राजकीय गॉडफादर कोण, बडगुजर यांनी कुणाकुणाला फोन केले, फोनमधील सीडीआर तपासावा, अशी मागणी करून नितेश राणे यांनी पार्टीतील छायाचित्र व चित्रफित असल्याचा दावा केला. मंत्री दादा भुसे आणि भाजप नेते आशिष शेलार यांनीही या मुद्यावरून ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR