सोलापूर : अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वर्षाकाठी
हजारोंच्या संख्येने नाहक लोकांचे बळी जात आहेत. मृत्यूच्या व जखमींच्या आकड्यांत दिवसेंदिवस भर पडत आहे. रात्री १२ च्या नंतर व पहाटेच्या सुमारास सर्वाधिक अपघात होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी आता महामार्गाच्या माध्यमातून वाढल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे.
अनेक शहरांना जोडणारे रस्ते चांगले झाले आहेत. कारवाई करूनदेखील चालक नियमांचे पालन करीत नाहीत, लेन कटिंग, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, माल वाहतूक करणारी वाहने, सीट बेल्ट न घालता चारचाकी तर हेल्मेट न घालता दुचाकीस्वार वाहन चालवतात, मागील दोन वर्षांत ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यू झाले आहेत. तेथे रस्त्यांची खराब स्थिती, रस्त्यांची नीट देखभाल न होणे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन अशा कारणांमुळे हे अपघात होतात. अति वेगाने वाहने चालविल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होतात.
सोलापूर जिल्ह्यात २०२२ साली एकूण २०७२ अपघात झाले. २०२२ सालात अपघातांमध्ये ६४१ जणांचा मृत्यू झाला.जानेवारी ते ऑगस्ट २०२३ अखेर जिल्ह्यात ८०६ अपघात झाले. त्यामध्ये ४६५ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले. जिल्ह्यात दिवसा होणाऱ्या अपघातांची टक्केवारी १० टक्के एवढी असून, रात्री १२ नंतर ४ वाजेपर्यंत होणाऱ्या अपघातांची टक्केवारी ४० टक्के एवढी आहे. याशिवाय पहाटे ४ ते सकाळी ६ वाजेपर्यंत होणाऱ्या अपघातांची टक्केवारी ५० टक्के एवढी आहे.
रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण ओव्हरस्पीडिंग असल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय बेदरकारपणे वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार घडत आहेत. या कारणांमुळे रस्ते अपघातांत वर्षानुवर्षे वाढ होत आहे.