पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एका कार्यक्रमादरम्यान खेळासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, जो पदक आणेल त्याला नोकरी मिळेल. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, बिहारमधील प्रत्येक शाळेत खेळाचे वातावरण दिसले पाहिजे. राज्यात खेळाला चालना देण्यासाठी आम्ही हे धोरण आणले आहे, असेही ते म्हणाले.
तेजस्वी यादव म्हणाले की, आज लोकांना शिक्षित होऊनही नोकऱ्या मिळत नाहीत. पदवी आहे, पण नोकरी मिळू शकत नाही. आपल्या समाजाची समस्या म्हणजे बेरोजगारी. आमच्या राज्यात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हे नवीन धोरण आणले आहे. ते म्हणाले की, आम्ही खेळाशी संबंधित ८१ जणांची निवड केली आहे, ज्यांना आम्ही नोकरीच्या माध्यमातून अधिकारी बनवत आहोत. त्या लोकांनाही आम्ही लवकरच जॉइनिंग लेटर देऊ, असे ते म्हणाले.
तेजस्वी यादव म्हणाले की, खेळाबाबत हे वातावरण प्रत्येक शाळेत दिसले पाहिजे, विशेषत: बिहारच्या ग्रामीण भागात, हे वातावरण तिथेही निर्माण झाले पाहिजे. गरीबांनाही शिक्षणाचा अधिकार मिळावा, त्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी बिहार सरकारने सुमारे १ लाख ३२ हजार शिक्षकांची भरती केली असल्याचे तेजस्वी यांनी सांगितले.