अहमदपूर : प्रतिनिधी
या तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीमधील ३६५ कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी दि १८ ते २० डिसेंबर सलग तीन दिवस काम बंद करून शासनाचे लक्ष वेधणार आहेत. याबाबत येथील गट विकास अधिका-यांना निवेदन देण्यात आले असून पंचायत समितीच्या कार्यालयासमोर अनेक कर्मचारी आपले काम बंद करून मागण्यासाठी सकाळी १० वाजेपासून सलग तीन दिवस ठाण मांडून बसणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष जिलानी शेख यांनी दिली आहे.
अहमदपूर तालुक्यात आकृती बंध यामध्ये १६५ कर्मचारी कार्यरत असून काही ग्रामपंचायतींनी मानधनावर जवळपास २०० कर्मचारी कामासाठी ठेवलेले आहेत. हे कर्मचारी कामगार सेनेचे काही ग्रामपंचायत लिपिक आहेत, तर कार्यालयीन कामकाज व देखरेख करणारे, गावात पाणीपुरवठा करणे आणि साफसफाई करणारे कामगार या संपामध्ये सर्वच सहभागी होणार आहेत. ग्रामपंचायत कर्मचा-यांंना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचा-याप्रमाणे वेतन श्रेणी सुरू करणे, निवृत्तीवेतन लागू करणे ,उपदान लागू करणे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम (ई.पी.एफ) या कार्यालयात जमा करणे, सुधारित किमान वेतन लागू करणे व वेतनासाठी वसुलीची अट रद्द करणे, जिल्हा परिषद सेवेत ग्रामपंचायत कर्मचा-यांमधून भरती करत असताना एकूण रिक्त पदाच्या दहा टक्के प्रमाणे वर्ग तीन व वर्ग चारच्या पदावर पद भरती करून नियुक्ती देणे, आकृतीबंधात सुधारणा करणे, माहे ऑगस्ट २०२० ते मार्च २०२२ पर्यंत थकीत वेतन तात्काळ अदा करणे आदी मागण्या संदर्भातचे निवेदन देण्यात आले आहे. या बंदमुळे अनेक गावांमध्ये अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मागण्या मान्य करावे यासाठी जिलानी शेख -तालुकाध्यक्ष, संजय गुटे तालुका उपाध्यक्ष ,रोहिदास श्रीमंगले, दादासाहेब कांबळे, मंगेश जाधव आदी पदाधिका-यांसोबत एकनाथ पवार , काशिनाथ भोगे, ईश्वर हंडेबाग, रवी इगवे, धोंडदेव साळुंखे यांच्यासह कर्मचारी सहकार्य करीत आहेत.