चेन्नई : मिचाँग चक्रीवादळाच्या प्रभावातून तामिळनाडू अद्याप सावरलेले नाही. राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा ते सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या दक्षिणेत रस्ते आणि लोकांच्या घरातही पाणी तुंबले आहे. मुसळधार पावसमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तमिळनाडूतील तिरुनेलवेली, तुतीकोरीन, तेनकासी आणि कन्याकुमारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. तुतीकोरीनमधील तिरुचेंदूरमध्ये सोमवारी दुपारी दीड वाजेपर्यंत अवघ्या १५ तासांत ६० सेमी पाऊस झाला आहे.
मुसळधार पावसामुळे धरणांमधूनही पाणी सोडण्यात आले असून त्यामुळे अनेक भागात रस्ते काठोकाठ भरले आहेत. यासंबंधीचे अनेक व्हीडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये घरे पाण्याने भरलेली दिसत आहेत. दरम्यान, धरणांमधून पाणी सोडण्याबाबत आणि जनजीवनाची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे तामिळनाडू सरकारने १८ डिसेंबर रोजी तिरुनेलवेली, थुथुकुडी, कन्याकुमारी आणि तेनकासी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था, बँका आणि वित्तीय संस्थांना सुटी जाहीर केली होती.
स्थानकाकडे जाणारा रस्ता खराब झाल्याने बचावकार्य थांबवण्यात आले आहे. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. एनडीआरएफ स्थानकावर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. अन्नपदार्थ पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे दक्षिण रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, थुथुकुडी आणि श्रीवैकुंटम आणि कयालपट्टीम सारख्या भागांसाठी अतिरिक्त बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. या भागातून किमान ७,५०० लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना ८४ मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. ‘कॉमन अलर्ट प्रोटोकॉल’द्वारे ६२ लाख लोकांना एसएमएस अलर्ट पाठवण्यात आले होते.
८०० प्रवासी रेल्वे स्थानकावर अडकले
सुमारे ८०० प्रवासी तामिळनाडू रेल्वे स्थानकावर अडकले आहेत. तुतीकोरीन जिल्ह्यातील श्रीवैकुंटममध्ये हे प्रवासी अडकले आहेत. रेल्वे स्थानकाला चारही बाजूंनी पाण्याने वेढले असून रुळ खराब झाल्यामुळे गाड्या धावत नाहीत. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावरील गिट्टी पाण्यात वाहून गेली असून केवळ लोखंडी सळ्या असलेले सिमेंटचे स्लॅब दिसत आहेत.
सात दिवस मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील सात दिवस तामिळनाडूच्या अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तत्पूर्वी, चक्रीवादळामुळे रविवारी दक्षिण तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस झाला. अनेक भाग आणि घरे पाण्याखाली गेली. थमीराबराणी नदी दुथडी भरून वाहत आहे.