सोलापूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदद्वारा आयेजित २४ डिसेंबर २०२३ रोजी सोलापूर येथे होणा-या १९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस तर स्वागताध्यपदी सुहास पाटील जामगावकर यांची निवड झाल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक, जिल्हाध्यक्ष प्रा. पंडितराव लोहोकरे, शहराध्यक्ष रमेश खाडे आदी उपस्थित होते.
सबनीस यांनी एकूण ४५ हून अधिक ग्रंथांचे लेखन केले असून त्यामध्ये सामाजिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, ग्रामीण, प्रबोधनात्मक,चिंतनात्मक, धर्मशास्त्र, जीवनशास्त्र, आदी विषयांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह त्यांनी आजवर ४० हून अधिक विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे.
राज्य शासनाच्या पुरस्करांसह आजवर शेकडो पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ग्रंथपूजनाने या साहित्य संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ, परिसंवाद, कविसंमेलन, चर्चासत्र व संमेलनाचा समारोप असे स्वरूप असणार आहे.