धाराशिव : प्रतिनिधी
सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर चालत्या वाहनातून लाखो रूपये किंमतीचे साहित्य चोरीला जाण्याचे प्रकार धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीत वाढले आहेत. चोरीचे हे प्रकार येरमाळा ते पारडी फाटा दरम्यान अनेकवेळा होत आहेत. चोरट्यांनी व-हाडाच्या वाहनावर ठेवलेले नवरदेवाचे लग्नातील साहित्य, साड्या, सोन्याचे दागिने असे २ लाख ७१ हजार रूपयांचे किंमती साहित्य लंपास केले. ही चोरीची घटना १५ डिसेंबर रोजी घडली असून या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे दि. २० डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील वैभव बळवंत वाळवेकर हे छत्रपती संभाजीनगर येथून राष्ट्रीय महामार्गाने सोलापूर येथे त्यांची टेंम्पो ट्रॅव्हल्स बस घेऊन जात होते. बसच्या टपावर लग्नातील साहित्य दोरीने बांधून ताडपत्रीने झाकून ठेवले होते. साहित्यामध्ये ८ बॅगा, ज्यामध्ये पैठण्या, कांचीवरम, सिल्क, मोरपंखी व इतर काही साड्या, लेडीज ड्रेस, नवरदेवाचे लग्नातील साहित्य, मेकअप बॉक्स, ३ ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन अँटीक सोन्याचे मणी असा एकूण २ लाख ७१ हजार रूपये किंमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला. बीड घाट ते येडशी टोलनाक्याजवळील महालक्ष्मी हॉटेल दरम्यान हायवे रोडवर चालत्या वाहनातून चोरट्यांनी साहित्य लंपास केले. या प्रकरणी वैभव वाळवेकर यांनी दि.२० डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे कलम ३७९, ३४ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.