गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहेत. गडचिराेली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांकडून भारत बंदची हाक यापूर्वीच देण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी हिदूर- दोबुर- पोयारकोटी या रस्त्याच्या कामासाठी आणलेले तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी नक्षलवाद्यांनी जाळून टाकण्यात आले होते. मात्र नक्षलवाद्यांनी गुरुवारी रात्रीच्या वेळी आणखी दोन प्रवासी बस पेटवून दिल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रात्री उशिरा दोन खाजगी प्रवासी बसेस जाळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिजापूरहून बारसागुडाकडे जाणारी बस तिंबापूर गावाजवळ नक्षलवाद्यांनी थांबवून त्यातील प्रवाशांना उतरवले आणि ती बस जाळली. त्यानंतर काही किलोमीटर अंतरावर दुसरी बसही नक्षलवाद्यांनी जाळली. रात्री उशीरा ही घटना झाल्याने पोलीस शुक्रवारी सकाळी घटनास्थळी पोहचले.
गडचिराेली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी नक्षलवाद्यांचा भारत बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.