पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे घेतला जाणारा एमबीएच्या लीगल एसपेक्ट ऑफ बिझनेस या विषयाचा पेपर फुटला आहे. एमबीएच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राचा हा पेपर होता. चिखली येथील डी वाय पाटील कॉलेज येथून प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ डिसेंबर रोजी एमबीए २००९ रिवाईज प्रथम सत्रातील लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार होती. परंतु तत्पूर्वीच या विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्याचे आढळून आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. ऑक्टोबर २०२३ या सत्राची परीक्षा २१ नोव्हेंबर पासून सुरळीतपणे सुरू झाली आहे. एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा ११ डिसेंबर पासून सुरू झाली आहे. सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले आहे.