सोलापूर – विवाह नोंदणी दाखला देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकासह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिन्हे येथील ग्रामसेवक विठ्ठल पांडुरंग शिंदे व खासगी इसम खालीद शब्बीर नदाफ (वय ३०, रा. समाधान शाळेजवळ, अक्कलकोट रस्ता) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
उत्तर सोलापूर पंचायत समिती कार्यालय परिसरात ही कारवाई झाली. तक्रारदार यांनी दाखला ग्रामसेवक विठ्ठल शिंदे यांच्याकडे अर्ज केला होता. दाखला देण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी ग्रामसेवकांनी केली होती. ती लाच नदाफ याच्यामार्फत स्वीकारताना शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ग्रामसेवक शिंदे व नदाफ यांच्याविरोधात सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.