20.8 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रसरकारने दिलेला शब्द पाळावा

सरकारने दिलेला शब्द पाळावा

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने आरक्षणासाठी २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागून घेतला होता. सरकारकडे आता फक्त दोन दिवसांचाच अवधी आहे. आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे त्यांनी ठरवावे आणि आम्हाला जो शब्द दिला आहे, तो त्यांनी पाळावा अन्यथा सरकारला जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यासोबतच आंदोलकांवरील गुन्हेही तात्काळ मागे घ्यावेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. आता देवदेखील आरक्षणाला रोखू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

परभणी जिल्ह्यातील सेलू येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. मराठा आरक्षणासंबंधी निर्णय घेण्यासाठी आता सरकारकडे २ दिवस उरले आहेत. ही मुदत सरकारनेच दिलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घ्यावा. आता ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. आता दोन दिवस उरल्याने सरकारने तडजोडीसाठी पुढे यावे. २४ डिसेंबरपर्यंतचाच अवधी आहे. त्यानंतर आम्ही आमचा रस्ता धरू. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असेही जरांगे म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. आता देवही आरक्षण रोखू शकत नाही, असे सांगतानाच जरांगे पाटील यांनी आम्ही मुंबईला जाणार नाही. याबाबत आम्ही कुठेही तसे सांगितले नाही. त्यामुळे आंदोलकांना बजावण्यात येत असलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाची मागणी करीत आहोत. तुम्ही जर आम्हाला मुंबईत बोलावत असाल, तर तिकडेही येण्याची आमची तयारी आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

अंतरवालीतच मंत्र्यांचे बंगले उभारा : भुजबळ
मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यातून अभिनव कल्पना येत असतात. त्यांच्या मागण्या कायद्याला धरून आहेत. त्यामुळे जरांगेंशी वाटाघाटी न करता सरकारने ते म्हणतात त्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा जीआर काढावा, असा उपरोधिक टोला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे यांना लगावला. एवढेच नव्हे, तर मंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी ये-जा करण्यापेक्षा अंतरवाली सराटीतच दोन-चार मंत्र्यांचे बंगले बांधावेत, असेही म्हटले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR