लातूर : प्रतिनिधी
गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील सोनसाखळ्या लॉकेट चोरणा-या सराईत आरोपीला पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी बीड मधून ताब्यात घेत अटक केली असून ३३ ग्राम वजनाचा दोन लाख रुपये किमतीच्या सोनसाखळी जप्त केल्या आहेत. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणा-या चोरी व चैन स्रॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी,अमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
पोलीस ठाणे मुरुड येथे मनोज जरांगे यांचे सभेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील लॉकेट चोरीची घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे मुरुड येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे लॉकेटसह आरोपीला तेलगाव चौक, बीड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव उमेश सत्यवान टल्ले, वय ३३ वर्ष राहणार नूर कॉलनी, बीड असे असल्याचे सांगितले. नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने मुरुड येथील मनोज जरांगे यांचे सभेमधील एकाच्या गळ्यातून गर्दीचा फायदा घेऊन, चोरल्याचे कबूल केले. नमूद आरोपीने वर गुन्ह्यात चोरलेला सोन्याचे ३३ ग्रॅम वजनाच्या दोन लाख रुपये किंमतीचा सोन्याचा लॉकेट जप्त करण्यात आली आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजू भोसले, पोलीस अमलदार रियाज सौदागर, योगेश गायकवाड, रामहरी भोसले, प्रदीप स्वामी, यांनी केली आहे.