छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. त्यातुनच तरुणाने तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये अत्याचार केले. त्यानंतर तरुणाने युवतीसोबत लग्नास नकार दिला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून हर्सुल पोलिस ठाण्यात तरुणाच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अक्षय लक्ष्मीकांत स्वामी (रा.कांचनवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. हर्सुल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात पीडित तरुणी व आरोपी अक्षय हे दोघे २०२१ मध्ये एमबीएचे शिक्षण घेत होते. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यातुनच आरोपीने पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंधित ठेवण्यास भाग पाडले. त्यानुसार जून २०२१ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत शहरातील हॉटेल राजकमल, हॉटेल शाग्रीला, हॉटेल मृणाल, हॉटेल लक्ष्मीनारायण, हॉटेल आयरीस आदी ठिकाणी नेऊन अत्याचार केले.
पीडितेने आरोपीकडे लग्नाची मागणी केल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तुझ्यासोबत लग्न करणार नाही असे म्हणून माझ्या जिवाचे काहीतरी बरेवाईट करून घेईल अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणीने हर्सुल पोलिस ठाणे गाठत तरुणाच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक मारोती खिल्लारे करीत आहेत. गुन्हा नोंदविण्यात आलेला आरोपी अक्षय स्वामी हा मुंबईत टीसीएस कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. तर पीडित तरुणीही एका कंपनीत कार्यरत असल्याची माहिती हर्सुल पोलिसांनी दिली.