24.5 C
Latur
Saturday, January 25, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई स्वच्छतेचा पॅटर्न राज्यात राबविणार

मुंबई स्वच्छतेचा पॅटर्न राज्यात राबविणार

मुंबई : प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘संपूर्ण स्वच्छता मोहिमे’ला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. लवकरच स्वच्छतेचा हा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये टप्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘संपूर्ण स्वच्छता मोहिमे’अंतर्गत आज वरळी येथील डॉ. हेडगेवार चौक, आचार्य अत्रे चौक, माता रमाई आंबेडकर चौक, नायगाव येथील महाराणा प्रताप चौक, तसेच नायगाव बीडीडी चाळ परिसरातील गांधी चौक येथे स्वच्छतेच्या सुरू असलेल्या कामाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करीत त्यात स्वत: सहभाग घेतला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक आमदार रईस शेख, आमदार श्रीमती यामिनी जाधव, आमदार कालिदास कोळंबकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत आता दर आठवड्याला विविध प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) स्वच्छता केली जात आहे. मुख्यमंत्री स्वत: या मोहिमेत सहभागी होत आहेत. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. यामुळे मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहीम ही आता लोकचळवळ बनली असून स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था यात सक्रीय सहभाग घेत आहेत. या माध्यमातून आजुबाजूच्या प्रशासकीय विभागांतील मनुष्यबळ तसेच सक्शन मशीन, एअर प्युरिफायर, मिस्ट मशीन अशा आधुनिक साधनसामग्रीचा वापर करून रस्त्यांची सफाई, रत्यांवरील माती काढणे, पुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे रस्त्यांची धुलाई करणे, अंतर्गत रस्ते, पदपथ, नाले, सार्वजनिक शौचालये आदी स्वच्छ करणे ही कामे केली जात आहेत.

यासाठी एक हजार टँकर भाड्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेमुळे नियमित सफाईची कामे करणे सोयीचे होत असून याचे दृश््य परिणाम येत्या काळात दिसून येणार आहेत. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत असून सुशोभिकरणाची कामे वेगाने होत आहेत. प्रत्येक चौकात झाडे लावणे, अर्बन फॉरेस्टच्या माध्यमातून हरीत क्षेत्र वाढविणे ही कामे केली जात आहेत. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी याचा मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छता कर्मचारी हे खरे हिरो
मुंबई स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि प्रदूषण मुक्त करण्यात येत आहे. स्वच्छता हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. त्यामुळे जगात सर्वांना अपेक्षित अशी स्वच्छ आणि सुंदर मुंबई करण्यावर भर दिला जात आहे.

मनपाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. बस थांबे स्वच्छ ठेवावेत, दुभाजकांमधील झाडे व्यवस्थित लावावीत, रस्ते एक दिवसाआड धुतले जावेत, धूळ उडू नये यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारती झाकल्या जाव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. या मोहिमेत अधिका-यांबरोबरच स्वच्छता कर्मचा-यांचा मोलाचा वाटा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR